चिन्यांच्या लठ्ठपणामुले शी जीनपिंग चिंतेत

फोटो साभार नवभारत टाईम्स

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन मध्ये निम्म्याहून अधिक जनता लठ्ठ बनल्याने तो राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे. चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांच्या कम्युनिस्ट पार्टी सरकारने या ओव्हरवेट नागरिकांना शेप मध्ये आणण्यासाठी अनेक योजना लाँच केल्या असल्याचे समजते.

बुधवारी राष्ट्रीय स्वास्थ आयोगाचा रिपोर्ट जारी करण्यात आला त्यानुसार चीन मध्ये स्थूल नागरिकांना स्थुलपणातून बाहेर काढण्यासाठी तातडीची उपाययोजना करणे भाग आहे. २०२० मध्ये चीन देशात एकूण लोकसंख्येत स्थूल नागरिकांचे प्रमाण २९ टक्के होते ते आता ५० टक्क्यांवर गेले आहे. यातही वयस्क नागरिकांची संख्या मोठी आहे.

या अहवालात असेही नमूद केले गेले आहे, की चीन मध्ये आर्थिक वृद्धी वेगाने झाली त्यामुळे जीवनशैली, आहार आणि व्यायामाच्या सवयीत बदल झाले आहेत. परिणामी नागरिकांचे लट्ठ होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि स्थूलपणाशी संबंधित अन्य व्याधी वाढल्या आहेत. करोना संक्रमणाच्या वेळी स्थुलेतेचे वाढलेले प्रमाण ठळकपणे सामोरे आले होते कारण जास्त वजन असलेल्या लोकांना करोनाचा धोका अधिक आहे.

पोषण तज्ञ वांग दान यांच्या मते वयस्क नागरिकांत व्यायामाचे प्रमाण कमी झाले असून त्यांच्या कामाचे वेळापत्रक अस्वास्थ्यकर आहे. प्रौढ नागरिकात १/४ नागरिक आठवड्यातून एकदाच व्यायाम करतात आणि मांसाहाराचे प्रमाण वाढले असून फळे आणि भाज्या अगदी कमी प्रमाणात सेवन केल्या जातात असे पाहणीत दिसून आले आहे. अर्थात स्थुलता ही केवळ चीनची नाही तर जागतिक समस्या बनल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २०२० मध्ये जाहीर केले आहे. १९७५ नंतर स्थूल व्यक्तींच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून विकसनशील देशात हे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते.