गौतम गंभीरने सुरु केली ‘ जन रसोई’, १ रु. पोटभर जेवण

फोटो साभार नवोदय टाईम्स

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर याने गरजवंताना पोटभर, सकस, स्वच्छ  जेवण मिळावे यासाठी पूर्व दिल्लीत गांधीनगर येथे पहिले भोजनालय सुरु केले आहे. ‘जन रसोई’ या नावाने ही योजना चालविली जाणार असून येथे दुपारच्या वेळात १ रुपयात गरजूंना डाळ भात भाजीचे जेवण दिले जाणार आहे. २६ जानेवारी रोजी असे दुसरे भोजनालय अशोकनगर भागात सुरु होणार आहे.

गंभीर या योजनेविषयी बोलताना म्हणाला, कोणत्याही जात, पंथ, धर्म आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या लोकांना चांगले सकस जेवण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. पण बेघर, बेसहारा लोकांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. त्यामुळे पूर्व दिल्लीतील १० विधानसभा क्षेत्रात किमान एक जन रसोई सुरु करणार आहे.

जन रसोई आधुनिक असतील आणि एकावेळी १०० लोक तेथे जेवण करू शकतील. पण सध्या करोना मुळे एकावेळी ५० जणांना जेवण दिले जाणार आहे. या जेवणाचा खर्च गौतम गंभीर फौंडेशन आणि खासदार निधीतून केला जाणार असून त्यासाठी कोणतीही सरकारी मदत घेतली जाणार नाही असे सांगितले गेले.