देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे होण्यासारखे दुर्भाग्य दुसरे नाही – निलेश राणे


मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तवले आहे. त्याचबरोबर आमचा एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विरोधी पक्षाला असला, तरी राज्यात तीन पक्ष एकत्र आल्यामुळे येत्या काळात एकाच पक्षातून पक्षांतर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी काल केला होता. भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.


या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केले असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही. कुबड्यांवर सरकार चालत आहे. तसेच उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर, फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचे वाटोळे करेल, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे तरीही संज्या राऊत निर्लज्जासारखा म्हणतो सेनाभवन राजकीय भूकंपाचं केंद्र होणार, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.