नवी दिल्ली – शेतकऱ्यांकडून मोदी सरकारच्या तीन कृषि विधेयकांना होत असलेला विरोध अद्यापही कायम असून शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. भाजपने नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी केलेल्या जाहिरातबाजीचा फज्जा झाला आहे. जाहिरातीत भाजपने दाखवलेला शेतकरीच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात धरणे देत असल्यामुळे भाजपच्याच अंगलट ही पोस्टरबाजी आली असून, ते पोस्टरही पक्षाकडून हटवण्यात आले आहे.
भाजपच्या जाहिरातीमधील ‘तो’ शेतकरीच करत आहे दिल्लीत आंदोलन
शेतकऱ्यांकडून नव्या कृषी विधेयकांना प्रचंड विरोध होत आहे. शेतकरी तिन्ही विधेयके मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार व भाजपकडून तिन्ही कायद्यांचे फायदे पटवून देण्याचे काम केले जात आहे. पंजाब भाजपने याचसाठी हरप्रीत सिंह यांचा फोटो वापरून कायद्यांचे फायदे सांगणार पोस्टर तयार केले आहे. यात सुखी शेतकरी म्हणून हरप्रीत सिंह यांना दाखवण्यात आले आहे.
Besharmi Di Vi Koi Hadd Hundi Ae
Par Lagdaa Inaa Kol JIO De Unlimted Internet Waang Ina Kol Besharmi Di Hadd Vi Unlimted ae. Inaa Nu Dasso Innaa Daa Bhaapa Singhu Baithaa. Yadde Modi With Farmers De. #ShameOnBJP #ModiAgainstFarmers#supportfarmers #IndiaSupportFarmerProtest pic.twitter.com/JRwVTonoer— Harp Farmer (@harpfarmer) December 22, 2020
विशेष बाब म्हणजे हरप्रीत सिंह हेच स्वतः सध्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात धरणे देत आहेत. सोशल मीडियात हरप्रीत सिंह यांच्या या पोस्टरविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे. पंजाब भाजपने त्या पोस्टरवरून टीका सुरू झाल्यानंतर हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केले आहे.
पोस्टरवर भाजपने वापरलेला हरप्रीत सिंह यांचा फोटो सहा ते सात वर्षांपूर्वीचा आहे. पोस्टरवर हाच फोटो वापरण्यात आला असून, तो हरप्रीत सिंह यांच्या परवानगी विनाच वापरण्यात आल्याचा दावा सिंह यांनीच केला आहे. मी सिंघू बॉर्डर आंदोलन करत असताना हा फोटो भाजपने वापरला असल्याचे हरप्रीत सिंह यांनी म्हटले आहे.
शेतकरी नव्या कृषी कायद्यांमुळे खुश नाहीत. सिंघू बॉर्डरवर भाजप प्रणित सरकार एकदाही आलेले नाही. या कायद्यांविरोधात शेतकरी का आहे, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारने केलेला नाही. या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि दिवसेंदिवस त्यांचा राग वाढत चालला असल्याचे हरप्रीत सिंह यांनी म्हटले आहे.