म्हणून Dominic ला पुढील ६० वर्षांपर्यंत फ्री पिझ्झा देणार Domino’s


पिझ्झासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या फास्ट फूड चेन डॉमिनोजकडून ऑस्ट्रेलियाच्या एका दाम्पत्याला पुढील ६० वर्षांपर्यंत दर महिन्याला मोफत पिझ्झा देणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील या जोडप्याने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलाचे आई-वडिलांनी नाव ठेवले आणि त्याच नावामुळे आई-वडिलांचा आनंद आता गगनात मावत नाही आहे. या जोडप्याचे नाव क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट असे असून त्यांना ९ डिसेंबर रोजी मुलगा झाला, Dominic असे त्यांनी मुलाचे नाव ठेवले. पण, आपल्याला या नावामुळे एवढे भन्नाट गिफ्ट मिळणार असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती.

९ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये डॉमिनोजला ६० वर्ष पूर्ण होणार होती. कंपनीने त्यानिमित्त एका ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले होते. ९ डिसेंबरला जन्माला येणाऱ्या मुलाचे नाव Dominic असे ठेवल्यास त्यांना मोठे गिफ्ट देण्यात येईल अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. पण क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट यांना या स्पर्धेबाबत काहीही कल्पना नव्हती. योगायोगाने त्यांच्या घरी पाळणा ९ डिसेंबर रोजीच हलला आणि त्यांनी त्याचे नाव Dominic ठेवले. त्यांनी बाळासाठी हे नाव आधीच ठरवले होते.

नातेवाईकांना बाळाच्या नावाबाबत समजल्यावर त्यांनी दांम्पत्याला स्पर्धेबाबत सांगितले आणि बाळाच्या जन्मानंतर काही तासांमध्येच त्यांना शानदार गिफ्ट मिळाले. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन डॉमिनोज कंपनीनेही याबाबतची माहिती दिली. प्रत्येक महिन्याला 14 डॉलरचा एक पिझ्झा पुढची 60 वर्ष या कुटुंबाला मोफत मिळणार आहे.