शिवसेनेसोबत आपल्याला कायम राहायचे असल्यामुळे जुळवून घ्या; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना


मुंबई – महाविकास आघाडीमुळे एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत कायमचा घरोबा होण्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण शिवसेनेसोबतच्या आघाडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसकडून बोलावण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, शिवसेनेसोबत आपल्याला कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण शिवसेनेबरोबर आपल्याला जुळवून घ्यायचे असल्यामुळे स्थानिक‌ पातळीवर शिवसेनेबरोबर जमवून घ्या, अशा स्पष्ट सूचना पवार यांनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या.

विधानसभा आणि लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसोबत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित होते. पराभूत झालेल्या उमदेवारांना मिळालेली मते, त्यांचे मतदारसंघातील वजन, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागात पक्षाची काय स्थिती आहे, यासह उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करून त्यावर मार्ग काढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

यापूर्वीच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष राज्यातील प्रमुख महानगरपालिकांसह महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले गेले आहे. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भूमिका मांडल्यामुळे चर्चा सुरू झाली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.