उद्धव ठाकरेंना मनसेचा सवाल; कोरोना काय फक्त रात्रीचाच फिरतो का?


मुंबई: राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासून (२२ डिसेंबर) नाईट कर्फ्यू लागू केला आहे. 5 पेक्षा जास्त लोक या नाईट कर्फ्यूदरम्यान एकत्र येऊ शकणार नाहीत. कोणताही नियम रात्री 11 पर्यंत बदललेला नाही. महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत निर्बंध असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी जाहीर केले आहे. मनसेने राज्य सरकार आणि महापालिकेच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, कोरोना काय फक्त रात्रीचाच फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचे नेमके कारण काय आहे. तसेच नाईट पार्ट्या तुम्ही करता, ते चालते. मग लोकांसाठीच बंधन का, असा सवाल उपस्थित करत कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत असल्याची टीकाही संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचे नाही, हे कुठलं लॉजिक असल्याचेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.