जम्मूमधील जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच घवघवीत यश


श्रीनगर – जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यंदा पहिल्यांदाच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकीत फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील गुपकर आघाडीला मोठे यश मिळाले आहे. गुपकर आघाडीने एकूण २० जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या या निवडणुकीत १३ जिल्ह्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुपकर आघाडीत सात पक्ष असून त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. दुसरीकडे सहा जिल्ह्यांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे.

जम्मू काश्मीरमधील स्थानिक पक्षांचा गुपकर आघाडीत मुख्यत्वे समावेश आहे. राजकीय प्रतिस्पर्धी असणारे नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचाही यामध्ये समावेश आहे. १०० हून अधिक जागांवर गुपकर आघाडीने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे ७४ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर २६ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.

ही निवडणूक २० जिल्ह्यात प्रत्येकी १४ जागांवर अशा पद्दतीने एकूण २८० जागांसाठी पार पडली असून नुकतेच त्याचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. आघाडीने अपेक्षेप्रमाणे काश्मीमध्ये विजय मिळवला असून जम्मूमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. गुपकर आघाडीने काश्मीरमध्ये ७२ जागांवर विजयी मोहोर उमटवली असून फक्त तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत. नऊ जिल्ह्यांमध्ये आघाडीने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे श्रीनगर जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतल्याने तेथील चित्र स्पष्ट नाही.

जम्मूमध्ये भाजपने ७१ जागांवर विजय मिळवला आहे. भाजप उधमूपर, सांबा, कठुआ अशा ठिकाणी विजयी झाली आहे. तर ४५ जागा नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने जिंकल्या आहेत. आपल्या अनेक नेत्यांना निकालाआधी ताब्यात घेतल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने केला आहे. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून असलेला पीडीपीचा युवक अध्यक्ष वाहीद पारा हा मंगळवारी जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत पुलवामा जिल्ह्य़ातून विजयी झाला. भाजपचे उमेदवार साजद अहमद रैना यांचा पारा याने पराभव केला. पहिल्यांदाच काश्मीरमध्ये भाजपने मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया देताना ही बदलाची लाट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा भाजपच्या तीन उमेदवारांनी पराभव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर जम्मू काश्मीरमधील लोकांचा विश्वास असल्याचे सिद्ध होत असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. दुसरीकडे ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी मात्र या निकालांवरुन जम्मू काश्मीरमधील जनतेने ३६० कलम हटवण्याच्या निर्णयाला धुडकावून लावल्याचे सिद्ध होत असल्याचे म्हटले आहे.