पाकिस्तानत महागाईचा भडका; तब्बल ३० रुपयांना एक अंडे


इस्लामाबाद – भारताचा अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कायमच विरोध करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या अंत्यंत बिकट बनली असून पाकिस्तानतील ‘द डॉन’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार तेथील अंड्यांचे दर १९७ रुपये डझनपर्यंत पोहचले असून २१६ रुपये डझन किंमतीने खुल्या बाजारामध्ये अंडी मिळत आहेत. तर देशभरातील अंड्यांचे दर हे २०० ते २४० रुपये प्रती डझनच्या दरम्यान आहेत. हे दर रविवारचे असून पाकिस्तानात केवळ अंडीच महाग झालेली नाही तर भाज्यादेखील महाग झाल्या आहेत. पाकिस्तानातील सर्वसामान्यांचे कंबरडे महागाईमुळे मोडले आहे. पाकिस्तानात एक हजार रुपयांपर्यंत एक किलो आल्याची किंमत गेली आहे. यावरुनच देशातील वाढत्या महागाईचा अंदाज बांधता येईल.

‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार २१६ रुपये एवढी एक डझन अंड्यांची किंमत आहे. विशेष म्हणजे अंड्यांची मागणी हिवाळ्याच्या कालावधीमध्ये वाढलेली असतानाच दरही वाढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे लग्न सोहळे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत असले तरी मांस आणि अंड्यांचे दर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे पाकिस्तानात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाल्याचे पोल्ट्री मालक सांगतात. हॉटेल आणि कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये बंद असल्याने मागणीच नसल्यामुळे आता अनेक पोल्ट्री बंद झाल्यात. त्यामुळेच आता हळूहळू मागणी वाढत असली तरी त्या प्रमाणात पुरवठा नसल्याने किंमत वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

अंड्यांचे दर वाढल्याने सामान्यपणे शहरांमध्ये एक डझन अंडी खरेदी करणारी लहान कुटुंब आता दोन ते सहा अंडी खरेदी करत आहे. कराचीमधील एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार एक अंडे सामान्यपणे थंडीच्या कालावधीमध्ये १२ ते १३ रुपयांना विकले जाते. पण हे दर यंदा खूपच वाढले आहेत. पाकिस्तानच्या इतिहासामध्ये हे अंड्यांचे सर्वाधिक दर आहेत. सध्या ३० डझन अंड्यांची किंमत ही पाच हजार ८५० रुपये एवढी आहे, तर दोन महिन्यांपूर्वी ३० डझन अंड्यांची किंमत साडेचार हजार रुपये असल्याचे माहिती पोल्ट्री होलसेलर्स असोसिएशनचे महासचिव कमाल अख्तर सिद्दीकी यांनी दिली.

धान्यांच्या किंमतीवरही पाकिस्तानमध्ये परिणाम झाल्याचे दिसत आहे. ४० किलो गव्हासाठी येथे दोन हजार ४०० रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या गहू ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्याचबरोबर देशामध्ये गॅसचे संकटही आहे. देशामध्ये गॅसचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी आहे. योग्य वेळी सरकारने गॅस खरेदीबद्दल ठोस निर्णय न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.