पुढच्या आठवड्यात मिळू शकते सीरमच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता


नवी दिल्ली – पुढच्या आठवडयात भारतात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी मान्यता मिळू शकते. स्थानिक उत्पादकांनी यंत्रणांनी मागितलेला अतिरिक्त डाटा सादर केला असल्याची माहिती या घडामोडीशी संबंधित असलेल्या दोन सूत्रांनी रॉयटर्सला दिली. भारत हा ब्रिटिश औषध उत्पादकाच्या लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरु शकतो.

ऑक्सफर्ड लसीच्या मानवी चाचणीच्या डाटाचे ब्रिटनमधील औषध नियंत्रक विश्लेषण करत आहेत. जगातील भारत हा सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भारताला पुढच्या महिन्यापासून आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण सुरु करायचे आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतात ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन करत आहे. दरम्यान लसीच्या आपातकालीन परवान्यासाठी सिरमच्या बरोबरीने फायझर आणि भारत बायोटेकने अर्ज केले आहेत.

ऑक्सफर्डची लस मध्यम, अल्प उत्पन्न गटातील देश तसेच उष्ण वातावरणातील देशांसाठी मोठी आस आहे. विशेष म्हणजे ही लस स्वस्त आहे. ही लस फ्रिजमध्ये सामान्य तापमानातही स्टोअर करता येऊ शकते. फायझरची लस स्टोअर करणे त्या तुलनेत एक मोठे आव्हान आहे. भारतात CDSCO ने नऊ डिसेंबरला, तीन कंपन्यांनी आपातकालीन परवान्यासाठी केलेल्या अर्जाचा आढावा घेतला. सिरमसह अन्य दोन कंपन्यांकडून अतिरिक्त डाटा मागितला. सिरमने मागितलेला सर्व डाटा आता सादर केला आहे. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी आहे.