कचरा खरेदी करणारा एकमेव निसर्गरम्य देश स्वीडन

जगभरातील बहुतेक सर्व देशांना कचरा हा प्रश्न डोकेदुखीचा ठरला असून बहुतेक सर्व सरकारे स्वच्छता जागृती मोहिमा नेहमीच राबवीत असतात. भारतात पंतप्रधान मोदी अधून मधून झाडू हातात घेऊन रस्ते साफ करताना आणि त्यातून नागरिकांना स्वच्छता पाळण्याचा संदेश देताना दिसतात. मात्र या पृथ्वीतळावर असाही एक देश आहे जो दुसऱ्या देशातून कचरा आयात करतो. ऐकून नवल वाटेल पण हे अगदी सत्य असून या देशाचे नाव आहे स्वीडन.

स्वीडन हा एक निसर्गरम्य देश आहे. या देशातील नागरिकांनी निसर्गाचे महत्व ओळखले आहे आणि त्याप्रमाणेच या देशात पर्यावरणपूरक वस्तू वापराकडे लोकांचा कल आहे. स्वीडन मध्ये निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या निम्मी वीज कचऱ्यापासून तयार केली जाते. पण आता या देशाला कचऱ्याचा तुटवडा जाणवत आहे आणि कचऱ्याअभावी देशात सुरु असलेले रिसायकलिंग प्रकल्प बंद करण्याची पाळी आली आहे.

हे प्रकल्प सुरु ठेऊन उर्जा निर्मितीसाठी या देशाला कचरा हवा आहे आणि त्यासाठी त्यांनी नॉर्वे, जर्मनी, डेन्मार्क, फ्रांस आणि अन्य युरोपीय देशांकडून कचरा आयात करायला सुरवात केली आहे. सध्या आठ देशातून कचरा आयात केला जात आहे.

स्वीडन मधील नागरिक फक्त १ टक्का कचरा घराबाहेर देतात कारण कचऱ्याचा योग्य वापर कसा करायचा याच्या पद्धती त्यांनी समजावून घेतल्या आहेत. खासगी कंपन्या उरलेला कचरा जाळून त्यापासून उर्जा निर्माण करतात आणि ही वीज थंडी मध्ये घरोघरी घरे उबदार ठेवण्यासाठी पुरविली जाते.