लहान मुलांना दिली जाणार नाही करोना लस
फोटो साभार नेचर
करोना लसीकरण संदर्भात एक मोठी बातमी मंगळवारी आली असून त्यानुसार १८ वर्षाखालील मुलांना करोना लस दिली जाणार नसल्याचा खुलासा केला गेला आहे. लसीकरण संदर्भात ज्या आंतरराष्ट्रीय गाईडलाईन्स आहेत त्यानुसार ही लस लहान मुलांना दिली जाणार नाही. या विषयी अधिक माहिती देताना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले, देशात ३० कोटी नागरिकांना ही लस देण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. त्यात आरोग्य कर्मचारी, सुरक्षा क्षेत्र व अन्य गंभीर रोगांनी ग्रस्त असलेल्यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.
डॉ. पॉल यांच्या म्हणण्यानुसार करोना लसीच्या च्या मानवी चाचण्या झाल्या आहेत त्या प्रौढ नागरिकांवर झाल्या आहेत. शिवाय करोना संसर्ग होण्यात प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आहेत. १८ वर्षांखालील मुलांवर या लसीच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर या लसीचे काय परिणाम होतील याचा डेटा उपलब्ध नाही. अर्थात याचा अर्थ लहान मुलांना करोनाचा धोका नाही असा नाही.
तरीही मुळातच लहान वयात रोगप्रतिकारशक्ती चांगली असते आणि त्यामुळे या वायोगटावर करोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. या वयोगटात ज्यांना करोना लागण झाली त्यांच्या मध्ये फारच सौम्य प्रभाव दिसला आहे. ब्रिटन, युरोप, स्पेन, ऑस्ट्रिया येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनात एप्रिल मध्ये ३ ते १८ वयोगटातील ५८५ मुलांना करोना लागण झाली होती. हा रिसर्च ८२ हॉस्पिटल मध्ये केला गेला होता. लागण झालेल्यापैकी ६२ टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि ८ टक्के रुग्णांना आयसीयु मध्ये ठेवावे लागले होते. त्यातील चार मुलांचा मृत्यू झाला असला तरी या चार जणांना अन्यही आजार होते.