ग्रामीण जनता पैसे देऊन कोविड लस घेण्यास तयार
फोटो साभार मिंट
भारतात करोना लसीकरणाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरु झाली असून या दरम्यान गाव कनेक्शन नावाच्या वर्तमानप्रत्राने ग्रामीण भागात या संदर्भात एक सर्व्हेक्षण केले आहे. त्याच्या निष्कर्षानुसार ग्रामीण भागातील ४४ टक्के जनतेने कोविड लस मोफत न घेता पैसे भरून घेण्याची तयारी दाखविली आहे तर ३६ टक्के लोकांनी ही लस मोफत दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
१६ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ६० जिल्ह्यात हे सर्व्हेक्षण केले गेले. त्यात ६०४० गावकरयांना प्रश्न विचारले गेले. पैकी ५० टक्के जनतेने करोना हा चीनचाच डाव असल्याचे मत व्यक्त केले आहे. १८ टक्के लोकांनी करोना फैलाव हे सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे तर २० टक्के लोकांनी ही देवाची करणी असल्याचे म्हटले आहे. २२ टक्के लोकांनी करोना फैलावामागे जनतेची बेपर्वा वर्तणूक असल्याचे म्हटले आहे तर १८ टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.
पैसे भरून लस घेणाऱ्या जनतेत दोन तृतीयांश लोकांनी दोन डोस साठी ५०० रुपये देण्याची तयारी दाखविली आहे असेही दिसून आले आहे. हे सर्व्हेक्षण १० डिसेंबर रोजी केले गेले होते.