अमेरिकेतील बेरोजगारांना दर आठवड्याला २२ हजार तर गरजूंना मिळणार ४४ हजार रुपये


वॉशिंग्टन – कोरोना महामारीचा फटका जगभरातील अनेक देशांना बसला असला, तरी कोरोनाचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला बसला आहे. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे जगभरातील बहुतांश देशांमधील अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र पहायला मिळाले. पण याच अर्थव्यवस्थांना आता उभारी देण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये आर्थिक मदतीची घोषणा केली जात आहे. ६६३ लाख कोटींचे म्हणजेच ९०० बिलियन डॉलर्सच्या कोरोना मदतनिधीची घोषणा अमेरिकेतील संसदेनेही केली आहे. या नवीन आर्थिक मदतीमुळे बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर (२२ हजार रुपये) आणि गरजूंना ६०० डॉलर (४४ हजार रुपये) मदत दिली जाणार आहे. या आर्थिक पॅकेजमधून सर्वाधिक फटका बसलेले उद्योग, शाळा आणि आरोग्य सेवांनाही मदत केली जाणार आहे.

२० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन हे शपथ घेतील. त्यांनी सत्ता हाती घेण्यासंदर्भातील हालचाली यापूर्वीच सुरु केल्या आहेत. आम्ही एका महिन्यात परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करु. बायडेन आता याच कामासाठी स्वत:ची टीम वाढवत आहेत. बायडेन यांनी ट्विटवरुन, आम्ही एका महिन्यात सारे काही ठीक करण्यास सुरुवात करणार असल्याचे म्हटले आहे. सत्तांतर झाल्यानंतर बायडेन यांच्या टीमनेही पहिल्या दिवसापासून आम्ही जल आणि वायू प्रदुषणासंदर्भात जगातिक स्तरावर नेतृत्व करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. कोरोना आर्थिक पॅकेज अमेरिकन नागरिकांना फायद्याचे ठरणार असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.

रविवारी ९०० अरब डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजसंदर्भात एकमत असल्याचे अमेरिकन संसदेने सांगितले. कोरोना काळामध्ये सर्वाधिक फटका बसलेले व्यापारी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी तसेच कोरोनाच्या लसीकरणासाठी या निधीचा वापर केला जाणार आहेत. या आर्थिक मदतीसंदर्भात मागील बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. या आर्थिक मदतीसाठी अमेरिकन काँग्रेसनेही हिरवा कंदील दाखवला आहे. बायडेन यांनी यापूर्वीच कोरोनामध्ये सर्वात वाईट परिस्थिती झालेल्या समाजातील खालच्या थरातील व्यक्तींना मदत करणे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी निधी जाहीर करण्यासाठी सहमती दर्शवली होती.

या आर्थिक पॅकेजमधून अमेरिकेतील बेरोजगार, गरजूंना मदत केली जाणार आहे. आर्थिक भत्ते या सर्व पात्र लोकांना दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या निधीमधील काही भाग हा कोरोना लसीकरणासाठी वापरला जणार आहे. लसीकरण कशापद्धतीने करण्यात यावे यासंदर्भातील नियोजनापासून लस सर्व ठिकाणी पोहचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक कामांसाठी या निधीतील ठराविक भाग वापरला जाणार आहे.