कोरोना लसीसंदर्भातील ही बातमी मद्यप्रेमींची निराशा करणारी


नवी दिल्ली – जवळपास वर्षभर कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले. अद्यापपर्यंत कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नसून या महामारीने जगभरातील लाखो लोकांचे जीव घेतले. त्याचबरोबर अनेक देशांची अर्थव्यवस्था देखील विस्कळीत केली. त्याचमुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी घोषित केले. याच दरम्यान कोरोना व्हॅक्सिन आता लवकरच येणार असल्याची चांगली बातमी बऱ्याच दिवसांनी आली. पण मद्यप्रेमींची निराशा करणारी कोरोना व्हॅक्सिनची ही बातमी आहे.

यासंदर्भातील वृत्त जागरण डॉट कॉमने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतात ‘भारत बायोटेक’ची स्वदेशी लस ‘कोव्हॅक्सिन’ तयार करण्यात येत आहे आणि पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही लस तयार होणार आहे. पण मद्यप्रेमी या बातमीने जरा निराश झाले आहेत. याचे कारण असे आहे की, इंडियन कॉउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे आरोग्य अधिकारी डॉ. समिरन पांडे यांनी सांगितले की, कोरोनाची लस घेतल्यानंतर १४ दिवसांपर्यंत मद्यसेवन करण्यास पूर्णपणे मनाई असणार आहे.

रोगप्रतिकारक शक्ती शरीरात मद्य गेल्यामुळे कमी होते. हेच कारण आहे की, कोरोनाची लस देण्याआधीच हे सांगण्यात येत आहे की, व्हॅक्सिन घेतल्यानंतर १४ दिवस मद्यसेवनापासून दूर रहावे लागेल. मद्यसेवनाबाबत ही बाब फक्त भारतातच नाही तर इतर देशातही लागू होणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरू करणारा रशिया हा पहिला देश ठरला आहे. रशियात स्वदेशी व्हॅक्सिन ‘स्पूटनिक व्ही’ तयार झाली आहे आणि त्याच्या लसीकरण देखील रशियात सुरूवात झाली आहे. आरोग्यकर्मी, सुरक्षाकर्मी आणि शिक्षकांना रशियात सर्वातआधी ही लस दिली जात आहे. या देशातही स्पष्ट सांगण्यात आले आहे की, लस घेतल्यानंतर २ महिने मद्यसेवन करू नये.

भारतात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासंबंधी तज्ज्ञांनी सांगितले की, लस घेण्याच्या ७ दिवसांआधी मद्यसेवन बंद करावे लागेल. अन्यथा शरीरात अॅंटीबॉडी तयार होण्यास अडचण निर्माण होईल. ही बाब आता तळीरामांना निराश करू शकते. पण हेही सत्य आहे की, कोरोना व्हायरसला हलक्यात घेऊ नका. ती फार मोठी चूक ठरेल.