मृत गाय-बैलांची कातडी बाळगणे यापुढे गुन्हा नाही- मुंबई उच्च न्यायालय


नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यापुढे मृत गायींची किंवा बैलांची कातडी बाळगणे हा गुन्हा नाही असा निर्णय दिला आहे. गाय-बैलांची कत्तल, आयात निर्यात व मालकी करण्यास महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये मनाई आहे. पण मृत गायी किंवा बैलांचे मांस बाळगणे गुन्हा नाही. या संदर्भातील निर्णय न्यायाधीश व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने दिला आहे. मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणे हा गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शफिकउल्लाह खान या गाडी चालकाने १४ डिसेंबर रोजी यासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मृत गायींचे आणि बैलांचे मांस बाळगणे गुन्हा नसल्याचे म्हटले आहे. मृत गायी बैलांची कातडी बाळगल्याबद्दल शफिकउल्ला खान या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मृत प्राण्यांचे कातडे बाळगण्यात गैर काय असा प्रश्न विचारत या चालकातर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता त्यावर नागपूर खंडपीठाने निर्णय दिला आहे.

त्याचबरोबर न्यायालयाने गोवंश हत्या, विक्री, वाहतूक आणि खरेदीवर सरकारने घातलेल्या बंदीचा निर्णय योग्य ठरवला. सरकारने गोवंशाचे संवर्धन करणे आणि त्यासाठी त्यांच्या हत्येला प्रतिबंध करणे किती महत्त्वाचे आहे याबाबत मांडलेली भूमिका न्यायालयाने बंदीचा निर्णय योग्य ठरवताना मान्य केली. त्याच वेळेस गोवंश हत्या ही मुस्लिम धर्मीयांच्या प्रथेचा भाग आहे. पण काही गरीब मुस्लिम बकऱ्याचा बळी देऊ शकत नसल्याने ते गोवंशाचा बळी देतात, असा दावा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या काही याचिकाकर्त्यांचा केला होता.