मुंबईतील क्लबवर केलेल्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांचा ट्विटच्या माध्यमातून इशारा


मुंबई – जवळपास वर्षभर कोरोनाच्या दहशतीखाली असलेले जग आता कुठे मोकळा श्वास घेण्याची तयारी करत होता, त्यातच आता कोरोनाचा नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आल्याने केंद्र सरकारने देशातही सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत. पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना राज्य सरकारकडून कडक सूचना देण्यात आलेल्या असून, मुंबईतील एका क्लबमध्ये कोविडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आल्यामुळे ३१ डिसेंबरला बाहेर जाऊन सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी सूचक इशारा दिला आहे.

सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर ही कारवाई करण्यात आली. एएनआयशी बोलताना मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कोरोनाशी संबधित नियमांचे पालन न केल्याने तसेच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. मुंबई पोलिसांनी या घटनेचा संदर्भ देत ट्विट करत रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल आधीच इशारा दिला आहे. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’, असे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


ही कारवाई मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असतानाच करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्यात ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार असून, विशेषत: हॉटेल व्यवयासाला त्याचा मोठा फटका बसेल, असे मानले जाते.