मुंबईत अंबानी यांच्या घराला शेतकरी वेढणार?

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अजून कोणताही तोडगा निघाला नसतानाच राष्ट्रीय शेतकरी मजूर संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते व्ही एम सिंग यांनी मंगळवारी रिलायंस अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराला शेतकरी वेढा घालणार असल्याचे सांगितले. सोमवारी यूपी गेट येथे पत्रकार परिषदेत बोलताना सिंग यांनी महाराष्ट्रातील आमचे सहकारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अंबानी यांच्या घराला वेढा घातला जाणार असल्याचे सांगितले. मुंबईत मात्र या वृत्ताची पुष्टी होऊ शकलेली नाही.

सिंग म्हणाले, अंबानी यांच्या घराला वेढा घालून आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेती क्षेत्रात कार्पोरेट क्षेत्र गरजेपेक्षा अधिक लक्ष घालत आहे याचा निषेध केला जाणार आहे. अंबानी याना शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या जातील. सिंग म्हणाले केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत त्यामुळे कार्पोरेट क्षेत्राने यातून पाउल मागे घ्यावे, त्यांनीच सरकारला हे कायदे मागे घेण्यास सांगावे, शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य करण्यास सांगावे असा आग्रह केला जाणार आहे.

या कायद्यामुळे शेतकरी दुःखी आणि बाजार खुश असा प्रकार होणार आहे. कृषी प्रधान देशात हे योग्य नाही. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत मात्र आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार जागोजागी रोखत आहे. जेथे रोखले जाईल तेथेच आम्ही गाजीपूर बनवू, लंगर लावू असेही सिंग यांनी सांगितले.