काश्मीर लडाख मार्गावर जोजीला बोगद्याजवळ वसणार सुंदर हिल स्टेशन

जम्मू काश्मीर आणि लडाखच्या मध्ये जोजीला बोगदा आणि काश्मीर झेड मोडपासून जवळ नवे हिल स्टेशन वसविले जात असल्याचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. निसर्गसौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडच्या दावोस पेक्षा हे पहाडी नगर अधिक सुंदर आणि निसर्गरम्य असेल असेही गडकरी यांनी सांगितले. यामुळे आता भारतीय पर्यटकांना स्विझर्लंडचा व्हिसा मिळविणे. पासपोर्ट आणि खर्च या सर्वातून सुटका मिळूनही स्वित्झर्लंडच्या हिल स्टेशनवर गेल्याचा आनंद लुटता येणार आहे.

गडकरी म्हणाले या भागात नवे पहाडी शहर वसविणे ही जागतिक पातळी वरची योजना आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, या भागाचा विकास वेगाने होईल शिवाय किमान १० हजार रोजगार निर्माण होतील. या संदर्भात दोन्ही भागाच्या उपराज्यपालांची बैठक बोलावली गेली असून सहा वर्षात या पहाडी नगरीचे काम पूर्ण केले जाणार आहे.

या पहाडी नगरीचा नकाशा आणि रचना नामवंत वास्तू विशारद आणि नगर रचनाकार करणार आहेत. जोजीला बोगद्याचे काम वेगाने पूर्ण केले जात असून ह आशियातील सर्वात मोठा बोगदा आहे. ऑक्टोबर मध्ये या कामाची सुरवात केली गेली होती. या बोगद्यामुळे श्रीनगर लेह रस्ता वर्षातील १२ ही महिने सुरु राहणार आहे. या बोगद्यासाठी ११००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.