असा असेल ट्रम्प यांचा निवृत्तीनंतरचा प्लान

फोटो साभार न्यूज १८

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प जानेवारीच्या सहा तारखेला नवीन अध्यक्ष बायडेन यांचा शपथविधी होताच माजी अध्यक्ष बनतील. याच दिवसापासून ते सर्वसामान्य अमेरिकन बनतील. मात्र राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर ट्रम्प यांच्या काय योजना आहेत याची जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे. ट्रम्प हे मुळचे व्यावसयिक आहेत आणि त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. शिवाय निवडणूक फंडात जमलेले १८२५ कोटी त्यांच्याच ताब्यात आहेत.

काही जाणकारांच्या मते निवडणूक फंडातील ४०० कोटी नव्या पोलिटिकल अॅक्शन कमिटीकडे त्यांना द्यावे लागतील तरीही त्यांच्याकडे भरपूर रक्कम राहणार आहे. जो पर्यंत ट्रम्प व्हाईट हाउस मधून बाहेर पडत नाहीत तो पर्यंत या फंडाचे नियंत्रण त्यांच्या हाती आहे.

या पैशांचा उपयोग ते बंडखोरांना चिथावणी देणे, निष्ठावंताना इनाम तसेच प्रवास आणि कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा खर्च म्हणून वापरतील. त्याचबरोबर कायदेशीर रित्या बिले भागविण्यासाठी हा पैसा वापरला जाईल. ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे आहेत. गेल्या चार वर्षात त्यांनी जो फंड गोळा केला तो त्यांच्याचमुळे आहे याची पक्षाला कल्पना आहे. निवडणूक खर्चापोटी टेलिव्हिजन जाहिराती, डिजिटल जाहिरातीचे काम एका मिडिया कन्सलटन्सीतर्फे केले गेले होते आणि त्यासाठी ५१०० कोटी खर्च केला गेला आहे असेही समजते.

ज्या कंपनीला हे पैसे दिले गेले आहेत तेथे ट्रम्प यांची सून व कॅम्पेन सल्लागार लॉरा ट्रम्प बोर्ड मेंबर आहे. याच कंपनीत उपराष्ट्रपती पेन्स यांचा भाचाही बोर्ड मेंबर होता. आता या दोघानीही त्या पदाचा राजीनामा दिला आहे असेही सांगितले जात आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार सप्टेंबर पर्यंत ट्रम्प यांची संपत्ती ४००० कोटी होती. त्यांच्या विविध शहरात अनेक इमारती, हॉटेल्स, गोल्फ रिसोर्ट, मॅनहटन येथे ३५० पार्किंग लॉट, मार ए लागो क्लब अश्या मालमत्ता आहेत.