केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली देशातील कोरोना लसीकरणाच्या तयारीची माहिती


नवी दिल्ली – लवकरच देशातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम सुरु होण्याची शक्यता असून त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी राज्य सरकारांच्या मदतीने केंद्र सरकार करत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, सरकारने तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर प्राधान्यक्रम ठरवला असून त्यानुसार देशातील ३० कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल. आरोग्य कर्मचारी, कोरोना काळात लढणारे आघाडीचे कर्मचारी जसे पोलीस, सैन्य आणि स्वच्छता कर्मचारी, ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती तसेच ५० वयापेक्षा कमी असलेल्या पण विशिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती या लोकांचा यामध्ये प्राधान्यक्रमाने समावेश असेल.

आमचा प्रयत्न आहे की, आमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंध लस मिळावी. लसीच्या अनिश्चिततेबाबत निर्माण झालेल्या अडचणीबाबत आम्ही माहिती देत राहू. पण एखाद्याने जर ठरवले की त्याला लस नको आहे तर आम्ही त्याला जबरदस्ती करु शकत नसल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वैज्ञानिकदृष्ट्या पोलिओचे निर्मूलन करणे शक्य होते. त्याप्रमाणेच शेवटी कोरोनाचा संसर्ग देखील कमी होईल आणि हा आजारही साधारण होऊन जाईल, असा विश्वासही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर डॉ. हर्षवर्धन म्हणाले, राज्य सरकारच्या मदतीने केंद्र सरकारकडून लसीकरण मोहिमेची तयारी सुरु असून यासाठी जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर गेल्या चार महिन्यांपासून तयारी सुरु आहे. यासाठी टास्कफोर्स नेमण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी हजारो लोकांना देशभरात प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य स्तरावर सध्या प्रशिक्षण मोहिम सुरु असून याअंतर्गत २६० जिल्ह्यांमधून २०,००० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.