आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय


रियाध – आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला असून आणखी आठवडयाभरासाठी ही स्थगिती वाढवली जाऊ शकते. कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण सौदी अरेबियाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधी सौदीच्या जीएसीएने अधिसूचना जारी केली आहे. जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत असून ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार वेगाने फैलवणारा असून नियंत्रणाबाहेर असल्याचे यूकेमधील तज्ज्ञांचे मत आहे. काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आठवडयाभरासाठी विमानसेवा बंद करण्यात येत आहे. ही बंदी आणखी आठवडयाभरासाठी वाढवली जाऊ शकते. सौदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व परदेशी विमानांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे जीएसीएच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

सौदीमध्ये मागच्या आठवडयात फायझरची कोरोना लस पोहोचली. तिथे लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल. सौदीमध्ये आतापर्यंत तीन लाख ६१ हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात सहा हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.