फेसबुकने ‘ब्लॉक’ केलेले किसान एकता मंचचे पेज पुन्हा केले ‘अनब्लॉक’


नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनामुळे कडाक्याच्या थंडीनं गारठलेल्या दिल्लीतील वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन सुरू असून, त्यातच रविवारी रात्री बराच गोंधळ संयुक्त किसान मोर्चाने तयार केलेल्या किसान एकता मंच फेसबुक पेजवरून झाला. हे पेज फेसबुकने ब्लॉक केल्यानंतर फेसबुकविरोधात संताप वाढल्यानंतर हे पेज पुन्हा ‘अनब्लॉक’ करण्यात आले.

शेतकऱ्यांचे दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. फेसबुकवर आंदोलनाची माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने किसान एकता मंच नावाचे पेज तयार करण्यात आले आहे. रविवारी अचानक हे पेज फेसबुककडून बंद करण्यात आल्याची माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. फेसबुक लाईव्ह करत असतानाच या दरम्यान पेज अनपब्लिश्ड झाल्याचा संदेश मिळाला. शेतकऱ्यांविषयी असे काही तरी आहे, ज्यामुळे हे सरकार घाबरले आहे आणि सरकार असे काहीतरी आहे ज्यामुळे फेसबुकला भीती वाटल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.

किसान एकता मंचचे इन्स्टाग्राम अकाऊंटही फेसबुकने बंद केल्याचा दावा यादव यांनी केला. फेसबुकने केलेल्या कारवाईवरून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर फेसबुककडून पुन्हा किसान एकता मंचच फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आले. किसान एकता मंचचे फेसबुक पेज ब्लॉक केल्यानंतर तीन तासांनी पुन्हा अनब्लॉक करण्यात आले. ही कारवाई फेसबुककडून करण्यात आली होती. त्यावर फेसबुकने नंतर खुलासाही केला आहे. कंपनीच्या कम्युनिटी नियमांचे किसान एकता मंचच्या पेजकडून पालन केले जात नसल्यामुळे पेज बंद करण्यात आल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे.