बायकोपासून त्रासलेल्या नवऱ्यांना ‘येथे’ मिळेल फुकट चहा!


नवी दिल्ली : सध्याच्या थंडीच्या दिवसात चहाच्या टपरीवरील गर्दी वाढत असून त्यातच अनेकांना चहाचे व्यसन असते. सकाळी डोळे उघडले की त्यांना चहा हवा असतो. तर ऑफिसमध्ये काम करताना, अभ्यास करताना, रात्री झोप उडावी म्हणून अशा कोणत्याही कारणांमुळे काहींना चहाची सवय असते. सध्या वेगवेगळे ब्रँड ‘चहाबाज’ मंडळींची ही आवड लक्षात घेऊन चहा उद्योगात उतरले असून, ते चांगला व्यवसाय करत आहेत.

यातच आता सोशल मीडियावर सध्या एक ‘बेवफा चायवाला’ व्हायरल झाला आहे. त्याच्या स्टॉलचे ‘कालू बेवफा चायवाला’ असे नाव आहे. या स्टॉलवर वेगवेगळ्या अजब नावांचा चहा मिळतो.

या चहावाल्याचे पोस्टर खुप काही सांगून जाते. हे पोस्टर पाहणाऱ्या व्यक्तीचे पाय त्याच्या दुकानापाशी थबकतात. कुणी पोस्टरसमोर सेल्फी काढतो. तर कुणी आपल्या मुडला शोभेल अशा चहाची ऑर्डर करतो. प्रेमभंग झाल्यावर, प्रेमी जोडप्यांसाठी, एकटे वाटत असेल तर, मनासासारखा जोडीदार मिळावा म्हणून असा कोणत्याही प्रकारच्या तुमच्या मुडसाजेसा चहा या स्टॉलवर मिळतो, असा दावा या पोस्टरवर करण्यात आला आहे. प्रेमभंग झालेल्या चहाबाजांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी बनवण्यात येणाऱ्या चहाची किंमत फक्त पाच रुपये आहे.

‘कालू चायवाला’ स्टॉलवरचा हा चहा सर्वात लोकप्रिय असून बायको त्रास देत असलेल्या पुरुषांना येथे फुकट चहा मिळतो. पण ग्राहकाने त्यासाठी पत्नीसह चहा स्टॉलवर येण्याची अट आहे. नवरा-बायकोमधील भांडणाचे प्रात्याक्षिक याठिकामी दाखवले तरच फुकट चहा मिळतो. या चहावाल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याच्या हटके पोस्टरवर आणि तेवढ्याच हटके कल्पनेवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा स्टॉल असल्याचा दावा काहींनी केला आहे.