कोरोनाच्या नव्या प्रकारच्या पार्श्वभूमीवर भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक


नवी दिल्ली – देशात सध्या कोरोना लसीकरणाच्या हालचालींना वेग आलेला असतानाच आता आरोग्य मंत्रालयापुढे आणखी एक आव्हान उभे राहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुळात हे आव्हान उभे राहण्यापूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीची बैठकही बोलवल्याचे म्हटले जात आहे. कोरोना व्हायरसचा एक नवा प्रकार ब्रिटनमध्ये निरीक्षणादरम्यान उघड झाल्यामुळे आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचा फैलाव नियंत्रणाबाहेर असण्यास कोरोनाचा हा नवा प्रकारच जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा ब्रिटनच्या शासनाकडून देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचा लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या ब्रिटनमधील या नव्या प्रकाराची माहिती मिळताच यावर चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवेतील डीजीएचएस यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडेल. भारतात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडरिको एच. ऑफ्रिन हेसुद्धा या बैठकीत सहभागी होण्याचा अंदाज आहे.