ट्रम्प यांच्या मार् ए लागो मधील वास्तव्याला सदस्यांचा आक्षेप 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन लवकरच ६ जानेवारी रोजी शपथ घेऊन व्हाईट हाउस मध्ये राहायला येतील आणि जुने अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प व्हाईट हाउस सोडतील. ट्रम्प यांचे वास्तव्य फ्लोरिडा पाम बीच वरील मारलागो क्लब मध्ये असेल असे सांगितले जात आहे. मात्र ट्रम्प यांच्या या इमारतीत कायम वास्तव्य करण्यास या क्लबच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे असे समजते. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या अमेरिकेत अनेक अलिशान मालमत्ता आहेत. पण कायम वास्तव्यासाठी त्यांनी मार् ए लागो रिसोर्टची निवड केली असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.

डोनल्ड ट्रम्प यांनी ही मालमत्ता १९८५ मध्ये ८० लाख डॉलर्सना खरेदी केली होती. २० एकर परिसरात असलेल्या या मालमत्तेत १२८ मोठ्या खोल्या आहेत. एखाद्या महालाप्रमाणे ही प्रॉपर्टी आहे. समुद्रकिनारी असलेली ही अलिशान, सुंदर इमारत असून ट्रम्प त्याला विंटर व्हाईट हाउस असेच म्हणतात कारण ऐन थंडीत सुद्धा इथे उबदार असते. मार् ए लेगो हा स्पॅॅनिश शब्द असून त्याचा अर्थ समुद्रापासून सरोवरापर्यंत असा आहे. या इमारतीचे बांधकाम १९२७ मध्ये सुरु झाले होते. त्या काळात येथे अतिश्रीमंतांच्या पार्ट्या होत असत.

ट्रम्प यांनी ही वास्तू खरेदी केल्यावर १९९३ मध्ये एक करार करून त्याचा क्लब बनविला आणि सदस्यत्व घेणाऱ्या लोकांना राहणे, पार्ट्या करणे यासाठी मोकळीक मिळाली. बिझिनेस इनसाईडरच्या रिपोर्ट नुसार त्यावेळी येथील सदस्यत्व घेण्यास ५० हजार डॉलर्स वर्षासाठी भरावे लागत पण आज त्यासाठी दोन लाख डॉलर्स शिवाय अन्य चार्जेस साठी १४ हजार डॉलर्स आणि डायनिंग केले अथवा नाही केले तरी २ हजार डॉलर्स भरावे लागतात.

ही प्रॉपर्टी ट्रम्प यांच्या मालकीची असली तरी तो क्लब आहे त्यामुळे त्यांना येथे कायमस्वरूपी राहता येणार नाही असे सदस्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प येथे वर्षातून तीन आठवडे राहू शकतील पण कायम राहू शकणार नाहीत असे समजते. डोनल्ड आणि मेलेनिया अनेकदा या क्लब मध्ये येऊन राहिलेले आहेत आणि मेलेनिया यांनी येथेच कायम वास्तव्य करण्याची तयारी केल्याचे सांगितले जात आहे.