भारतीयांनी स्मार्टफोनची दणकून केली खरेदी

करोना काळात अनेक उद्योग धराशायी झाले, बरेचसे रुळावरून घसरले, काही कसेबसे जिवंत राहिले तरी काही उद्योग क्षेत्रांनी मात्र गगनभरारी सुद्धा घेतली आहे. या उद्योगांनी नवी रेकॉर्ड केली असून त्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, वर्क फ्रॉम होम साठी लागणारी गॅजेट उद्योगाचा समावेश आहे. विशेषतः भारतीयांनी सप्टेंबर आक्टोबर तिमाहीत दणकून स्मार्टफोन खरेदी केली आहे. या दोन महिन्यात भारतीयांनी तब्बल ४ कोटी ४० लाख स्मार्टफोन खरेदी केले असल्याचे आयडीसी रिपोर्ट २०२० मध्ये नमूद केले गेले आहे.

या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारतात स्मार्टफोनच्या मागणीत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाली. करोना कोविड १९ मुळे ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम सुरु राहिल्याने स्मार्टफोनच्या मागणीला हातभार लागला असे सांगितले जात आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये २ कोटी १० लाख तर सप्टेंबर २०२० मध्ये २ कोटी ३० लाख स्मार्टफोन खरेदी केले गेले. या काळात ऑनलाईन फेस्टिव्हल शॉपिंगवर सवलती होत्या त्यात स्मार्टफोन खरेदी खुपच वाढली. या रिपोर्ट नुसार ऑक्टोबर मध्ये एकूण विकल्या गेलेल्या स्मार्टफोन पैकी २५ टक्के फोन दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई आणि कोलकाता या महानगरात विकले गेले आहेत.