आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री जनतेशी कोरोना आणि नववर्षाचे स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही नवी नियमावली नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जाहीर होणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मेट्रो कारशेड हस्तांतरणावरुन विरोधक गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आजच्या संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. न्यायालयाने मेट्रो कारशेड कांजूर मार्ग येथे उभारण्यास स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता असल्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकार चाचपणी करत आहे. मुंबई उच्च न्यायालयात मेट्रो कार शेडबाबत कांजूर मार्ग येथील जागेच्या संदर्भात सुनावणी सुरु आहे.

शनिवारी राज्यात 74 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3 हजार 940 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या करोना बाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असल्याने ती काहीशी चिंतेची बाब बनल्यामुळे राज्य सरकार या पार्श्वभूमीवर पुन्हा काही गोष्टींवर निर्बंध घालणार का हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.