महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांचा भाजप नगरसेवकांना सल्ला


पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका विकास कामाच्या उद्घाटन समारंभात बोलताना जनतेला निवडणुकीआधी दिलेला शब्द सर्वांनी पाळा, सर्व कामे करा. काही कामे राहात असतात, पण ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखे काम करु नका. आश्वासन निवडणुकीआधी द्यायचे आणि पुन्हा विसरायचे. १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ म्हणणाऱ्या शिवसेनेने कोरोना काळात अवाढव्य वीजबिले दिली, त्याचबरोबर शिवाय वाहून गेलेल्या घराला अडीच हजारांचे वीजबिल दिले. शिवसेनेसारखी अशी कामे आपल्याला करायची नसल्याचा सल्ला नगरसेवकांना दिला.

चंद्रकांत पाटील यांनी भाजपा नगरसेवकांना सल्ला देताना शिवसेनेवर निशाणा साधला. पाटील पुण्यातील उद्घाटन समारंभात शिवसेनेवर हल्लाबोल करताना म्हणाले की, निवडणुकीआधी शिवसेनेने १०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर आपले आश्वासन त्यांनी पाळले नाही. सर्वसामान्य नागरिकांना कोरोना महामारीच्या काळात सहा हजार रुपयांचे बील पाठवले. तर पुरामुळे आमच्या कागलमधील एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचे वीज बिल पाठवण्यात आले. सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा सवाल उपस्थित होतो.

त्याचबरोबर पाटील म्हणाले की, निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली पाहिजेत. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातूनही पैसा खर्च करावा. जनतेला दिलेल्या आश्वासनाची यादी प्रत्येक नगरसेवकांनी तयार करायला हवी. आपली कोणती कामे राहीली आणि केली याची नोंद यामध्ये असायला हवी. ही यादी भिंतीवर चिटकवा. जेणेकरून येता जाता दिसेल आणि लवकरात लवकर कामे होतील.