या प्राचीन मंदिराची प्रतिकृती आहे नवे संसद भवन?

नवीन संसद भवनाचे भूमिपूजन १० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले असून कोट्यवधीचा खर्च करून बांधली जाणारी ही इमारत सर्व कोनातून सुंदर दिसेल असे तिचे डिझाईन केले गेले आहे. मात्र सोशल मीडियावर नवीन संसद ही मध्यप्रदेशातील विदिशा येथे असलेल्या अतिप्राचीन विजय मंदिराची प्रतिकृती असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या दोन्ही वास्तू त्रिकोणाकार आहेत आणि वरून त्या पहिल्या तर अगदी एकसारख्या दिसत आहेत.

सुरवातीला जेव्हा नव्या संसदेचे फोटो आले तेव्हा अनेकांनी ते अमेरिकेच्या पेंटागॉन प्रमाणे असल्याचे मत व्यक्त केले होते. पण विजय मंदिर आणि नवी संसद यांच्यातील साम्य विस्मयकारक आहे. विदिशा येथे चालुक्यवंशी राजा कृष्ण यांचा पंतप्रधान वाचस्पती याने हे मंदिर बांधले होते. अति विशाल आणि अनोख्या रचनेमुळे हे मंदिर त्या काळात प्रसिध्द होते आणि त्यामुळेच सतत मुघल राजांच्या नजरेत खुपत होते. मुगल बादशहा औरंगजेब याने तोफा डागून हे मंदिर उधवस्त केले होते असे इतिहास सांगतो.

त्यापूर्वीही अनेक आक्रमक टोळ्यांनी हे मंदिर लुटले, पाडले पण श्रद्धाळूनी पुन्हा या मंदिराची उभारणी केली. देशाचा हा प्राचीन वारसा आहे आणि आज ही वास्तू पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. या मंदिराला बिजामंडळ असेही म्हटले जाते. अर्धा मैल लांब आणि तेवढेच रुंद असे हे मंदिर १०५ गज उंच होते. त्याचा कळस लांबूनही दिसत असे. येथील उत्खननात कीर्ती मुख म्हणजे मनुष्य वा सिंहाच्या तोंडाची आकृती कोरून दगडात कोरलेली नक्षी, वेली सापडले होते. दरवर्षी येथे नागपंचमीला जत्रा भरते आणि कुस्त्याचे फड लागतात.