दिसली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक

फोटो साभार डेक्कन क्रोनिकल

भारतातील जपानी दुतावासाने ई ५ सिरीज शिंक्सेन (जपानी बुलेटट्रेन)चे फोटो जारी केले असून हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २०२३-२४ ची डेटलाईन यापूर्वीच दिली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जपानची ही बुलेट ट्रेन आणखी मॉडीफाय करून मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन म्हणून चालविली जाणार आहे.

मोदी सरकारने या बुलेटट्रेन प्रोजेक्ट साठी २०२३-२४ हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी दिला आहे. या दोन शहरातील ५०८ किमीचे अंतर ३०० किमी प्रती तास या वेगाने ही ट्रेन दोन तासापेक्षा कमी वेळात कापणार आहे. त्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर निर्माण केला गेला असून या प्रकल्पाचा खर्च ९८ हजार कोटी आहे. या मार्गावर ही बुलेट ट्रेन ३७० किमी प्रती तास या वेगाने धावू शकेल असे सांगितले जात आहे.

हा प्रकल्प जपान सरकारच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान सहाय्याने केला जात आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे हे काम सुरु आहे. या प्रकरणी अनेक वाद निर्माण झाले असून आदिवासींच्या जमिनी बळकावल्या गेल्याचा आरोप विरोधक करत आहेत.