टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दारुण पराभव

ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच आठ विकेट्सनी पराभव केला आहे. चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी केवळ 90 धावा पाहिजे होत्या. ऑस्ट्रेलियाने केवळ दोन विकेट्स गमावत 21 ओव्हर्समध्येच दिलेलं लक्ष्य गाठत विजय आपल्या नावे केला .ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या . त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखलं. भारतीय संघाला दुसऱ्या डावात 53 धावांची आघाडी मिळाली होती परंतु, टीम इंडियाच्या फलंदाजांनी अत्यंत लाजिरवाणी खेळी करत दुसऱ्या डावात फक्त 36 धावा केल्या.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली भारताचा डाव अवघ्या 36 धावात संपुष्टात आला.कोणत्याच भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. तर हनुमा विहारीला 8 धावा करण्यात यश आलं. चेतेश्वर पुजारा, अजिंक रहाणे आणि आर अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने अवघ्या 8 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सला 21 धावा देऊन चार विकेट्स मिळवता आल्या.