लालतोंड्या माकडाला जन्मठेप

फोटो साभार न्यूज १८

खून, बॉम्बस्फोट अशी हिंसक कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांना जन्मठेप दिल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर असतात. पण एखाद्या प्राण्याला जन्मठेप झाल्याचे आपण ऐकले नसेल. घटना भारतातीलच असून कानपूर प्राणी उद्यानात एका लालतोंडया माकडाला जन्मभर पिंजऱ्यात राहावे लागणार आहे. हे माकड नंबर एकचे दारुडे, मांस प्रेमी आणि हल्लेखोर असून लहान मुले आणि महिलांवर ते हल्ले करून त्यांना चावे घेते.

मिर्जापूर जिल्यात हे आतंकी माकड एका तांत्रिकाने सांभाळले होते. तो तांत्रिक त्याला दारू पाजत असे त्यामुळे या माकडाला दारूचे व्यसन लागले. तांत्रिक मेल्यावर हे माकड मोकाट झाले आणि त्याने नागरिकांवर हल्ले करायला सुरवात केली. त्याने शेकडो मुले आणि महिलांना चावे घेतले आहेत. शेवटी त्याला वनविभागाच्या टीमने बंदुकीने बेशुद्धीचे इंजक्शन दिले आणि त्याला कानपूर प्राणी उद्यानात हलविले. येथील पशु वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि त्याच्या सवयी बदलाव्या यासाठी प्रयत्न केले मात्र तीन वर्षानंतर त्याच्यात कोणतीही सुधारणा दिसली नाही.

या माकडाचे तोंड लाल आणि बाकी शरीर काळे आहे त्यामुळे त्याला कालुआ नाव दिले गेले आहे. शेवटी या माकडाला आजन्म पिंजऱ्यात ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आजही या उद्यानात येणाऱ्या पुरुषांवर कालुआ गुरगुरतो आणि महिला आल्या तर त्यांना जवळ बोलावून चावा घेण्याचा प्रयत्न करतो असे समजते.