चीन १२ फेबृवारी पर्यंत ५ कोटी नागरिकांना देणार करोना लस
फोटो साभार सीटीजीएन
जगाला करोना कोविड १९ ची भेट देणाऱ्या चीन मध्ये लसीकरण मोहीम जोरात सुरु झाली असून १२ फेब्रुवारी पर्यंत पाच कोटी नागरिकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. याची सुरवात १२ जानेवारीला पाहिला डोस देऊन केली जात असल्याचे समजते. चायना मॉर्निंग पोस्ट ने शुक्रवारी या संदर्भात एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार लसीकरण कार्यक्रम अंतर्गत या आठवड्यात देशभर प्रादेशिक रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र अधिकारी यांची प्रशिक्षण बैठक घेतली गेली आहे. राष्ट्रीय औषध कंपनी साईनेफर्म व साईनोपॅक यांच्याकडून १० कोटी डोस घेतले गेले आहेत.
लसीकरणाची सुरवात १५ जानेवारीपासून होणार असून प्रत्येक प्रांतात लसीकरणाची तारीख वेगळी असेल. विशेष म्हणजे चीनने करोना संक्रमितांची संख्या ८६ हजार असल्याचे आणि ४६०० लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र या आकड्यांवर कुणीही विश्वास ठेवलेला नाही. करोनाची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसली असून येथे १.७३ कोटी करोनाग्रस्त आहेत आणि मृतांचा आकडा ३ लाख ११ हजारांवर गेला आहे.