पुण्यातील सहापैकी तीन पर्यटकांचा रत्नागिरीतील समुद्रात बुडून मृत्यू


रत्नागिरी – आज रत्नागिरीतील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला असून तिघांना वाचवण्यात यश आले आहे. पुण्यातील हे सर्व पर्यटक आहेत. तिघांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. दापोली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

रत्नागिरीतील दापोली तालुक्यात पुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी आले होते. आज हे पर्यटक (१८ डिसेंबर) दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले.

किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांच्या निर्दशनास ही घटना आल्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना सध्या दापोली येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे तरुण बुडत असल्याचे दिसून येताच स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यांना फक्त तिघांचेच प्राण वाचण्यात यश आले. इतर तीन पर्यटक तोपर्यंत पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध स्थानिक घेत होते.

दापोली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ धाव घेतली. त्यानंतर बेपत्ता असलेल्या तिघांचा शोध घेण्यात आला. हे तिघांचेही मृतदेह काही वेळाने आढळून आले. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, वाचवण्यात आलेल्या तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.