नियम आणि अटींसह नित्यानंदच्या ‘कैलासा’ देशाची दारे पर्यटकांसाठी खुली


नवी दिल्ली – दहा वर्षांपूर्वी सेक्सटेप प्रकरणामुळे चर्चेत आलेला स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंदने भारतातून पलायन करून देशाबाहेर एका बेटावर नवा देश वसवल्याची चर्चा होती. त्याने गेल्या वर्षी एक बेट विकत घेत, त्या बेटाला त्याने ‘कैलासा’ असे नाव दिले. त्याचबरोबर त्याने या बेटाला हिंदुंचा देश घोषित करत या बेटावर काही महिन्यांपूर्वी ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या बेटाच्या नावाने आता एक इ-मेल तयार करण्यात आला असून त्या बेटावरील व्हिसा या इ-मेलच्या माध्यमातून मिळवता येणार असल्याचे सांगितले जात आहे.

जगाच्या पाठीवर नक्की कुठे नित्यानंदने वसवलेले कैलासा बेट आहे, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण विविध माहितीच्या आधारे ऑस्ट्रेलियाच्या जवळपास कुठेतरी हे बेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नित्यानंद याने ऑस्ट्रेलियाहून कैलासा बेटावर जाण्यासाठी ‘गरूडा’ नावाची चार्टर्ड फ्लाईट सर्व्हिसही सुरू केल्याची चर्चा आहे. नित्यानंदने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही पर्यटकाला कैलासा बेटावर तीन दिवसांहून अधिक काळ वास्तव्य करता येणार नाही. या तीन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान या बेटावरील ‘परम शिवा’ नावाच्या जागी पर्यटकांना भेट देता येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यानंतर या बेटरूपी देशावर आता इ-मेलच्या माध्यमातून व्हिसा मिळवण्याची सुविधाही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.