२४४ धावांवर आटोपला भारताचा पहिला डाव


नवी दिल्ली – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली असून कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीमुळे पहिल्या दिवशी भारताने ६ गडी बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताचे तळातले फलंदाज दुसऱ्या दिवशी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष होते. पण स्टार्क आणि कमिन्स यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाची डाळ शिजू शकली नाही. २५ चेंडूत अवघ्या ११ धावा काढून भारताचे शेवटचे ४ फलंदाज माघारी परतले.

कमिन्सने दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात रविचंद्रन आश्विनला टीम पेनकरवी झेलबाद करत माघारी धाडल्यानंतर भारताचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. ६ बाद २३३ वरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केलेल्या भारतीय संघाची सुरुवात अवघ्या काही मिनीटांमध्ये ९ बाद २४० अशी झाली. कमिन्सने अखेरीस शमीला बाद करत २४४ धावांवर भारताचा पहिला डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४, पॅट कमिन्सने ३ तर हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी घेतला.