भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावात गुंडाळला


अॅडलेड – भारताने अॅडलेड कसोटीच्या पहिल्या डावात रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ५३ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २४४ धावांचा पाठलाग करताना १९१ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने कर्णधार टीम पेनचे अर्धशतक आणि मार्नस लाबुशेनची एकाकी झुंज या जोरावर स्वतःवरची नामुष्की टाळली. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले.

भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातही खराब झाली. बुमराहने मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना पायचीत करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. एका बाजू लावून धरत मार्नस लाबुशेनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. भारताकडे ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्याची चांगली संधी होती. पण लाबुशेनला भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन जीवदानं देत अत्यंत खराब कामगिरी केली. अखेरीस कर्णधार विराट कोहलीने रविचंद्रन आश्विनच्या हाती चेंडू दिला.

कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आश्विननेही ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. स्टिव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड आणि कॅमरुन ग्रीन यांना एकामागोमाग एक माघारी धाडत आश्विनने कांगारुंचा निम्मा संघ माघारी धाडला. भारतीय गोलंदाजांनी लाबुशेनला माघारी धाडण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेरीस कर्णधार पेन आणि लाबुशेन यांनी कांगारुंचा डाव सावरत दुसऱ्या सत्राअखेरीस ५ बाद ९२ अशी मजल मारुन दिली.

उमेश यादवने चहापानाच्या सत्रानंतर एकाच षटकात लाबुशेन आणि कमिन्सला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. कर्णधार टीम पेनने एक बाजू लावून धरत आपले अर्धशतक झळकावले. त्याला स्टार्कनेही उत्तम साथ दिली. अखेरीस स्टार्क आणि लॉयन या तळातील फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ करत टीम पेनने अखेरपर्यंत मैदानात टिकून राहत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. अखेरीस उमेश यादवने हेजलवूडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपवला. कर्णधार टीम पेन ७३ धावांवर नाबाद राहिला.