गुड न्यूज! भारतात होणार ‘स्पुटनिक व्ही’ या लसीच्या ३० कोटी डोसची निर्मिती


मॉस्को: कोरोना महामारीचे जगभरात थैमान सुरू असताना संपूर्ण जगाचे लक्ष आता कोरोना प्रतिबंधक लसींकडे लागून राहिले आहे. काही कोरोना प्रतिबंधक लसींची चाचणी पूर्ण झाली आहे, तर काही लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. तर, काही लसींचा वापर देखील सुरू करण्यात आला आहे. ब्रिटन, अमेरिका आणि रशियात कोरोना लसीकरण सुरूवात झाली आहे. लसीकरणात लस उत्पादनांबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात असतानाच भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. कारण आता भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीचे उत्पादन होणार आहे.

रशियाने भारतात लस निर्मितीबाबतची माहिती दिली असून रशियाने भारतातील चार औषध कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. याआधीपासून रशियाने भारतात लस उत्पादन व्हावे अशी आग्रही भूमिका मांडली होती. रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचे प्रमुख किरील दिमित्रेव यांनी सांगितले की, भारतात २०२१ मध्ये रशियन लसीचे जवळपास ३० कोटी डोसची निर्मिती करणार आहे. आम्ही त्यासाठी चार औषध कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे पुढील वर्षात रशियन लसीचे भारतात ३० कोटी डोसचे उत्पादन होणार आहे.

लस विकसित करणाऱ्या गोमालिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडीमियॉलजी अॅण्ड मायक्रोबायलॉजीने केलेल्या दाव्यानुसार ही लस कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर १०० टक्के प्रभावी ठरली आहे. तर, ही लस कोरोनाच्या विरुद्ध ९१.५ टक्के प्रभावी आहे. लस चाचणी डेटातून उपलब्ध माहितीच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लस चाचणीच्या पहिल्या कंट्रोल पॉईंटमध्ये लस ९२ टक्के प्रभावी आढळून आली होती. तर, दुसऱ्या कंट्रोल पॉईंटमध्ये ९१.४ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. रशियाची स्पुटनिक व्ही लस कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या बाधितांवर १०० टक्के प्रभावी ठरणार असल्याचे चाचणीत आढळून आले आहे.

लवकरच वैद्यकीय नियतकालिकेत लस चाचणीची माहिती संशोधन प्रकाशित केला जाणार आहे. त्यानंतर जगभरातील देशांमध्ये स्पुटनिक व्ही लसीच्या नोंदणीसाठी एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित देशांमध्ये लस वापरास परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीची भारतात चाचणी सुरू आहे. डॉ. रेडीज लॅबोरेटरीच्या माध्यमातून ही चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीचे परिणाम लवकरच येण्याची शक्यता आहे.