फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोरोनाबाधित


पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मॅक्रॉन सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. ते सात दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून गुरुवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. सध्या त्याच्यामध्ये प्राथमिक लक्षणे दिसून येत असून ते आयसोलेशनमध्ये असतानाही काम सुरु ठेवणार असल्याचे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यासंदर्भात फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची प्राथमिक लक्षणे मॅक्रॉन यांना सौम्य प्रमाणात दिसून आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल हाती आल्यानंतर मॅक्रॉन यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. फ्रान्समधील नियमांनुसार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता मॅक्रॉन सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. ते आपले काम या कालावधीमध्ये सुरु ठेवणार आहेत. व्हिडीओ कॉलवरुन या कालावधीमध्ये होणाऱ्या सर्व बैठकांना आणि चर्चा सत्रांनाही मॅक्रॉन उपस्थिती लावणार आहेत. मॅक्रॉन यांच्या संपर्कात आलेले देशाचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांच्या करोना चाचणीचा निकाल नकारात्मक आला आहे.