बेझॉस यांच्या पूर्व पत्नीने चार महिन्यात ३८४ संस्थांना केले ३० हजार ६६० कोटींचे दान


अ‍ॅमेझॉनचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझॉस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर यांच्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट पोटगी म्हणून मिळालेल्या संपत्तीमुळे चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मॅकेन्झी यांनी जगातील सगळ्यात खर्चीक घटस्फोटानंतर सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सर्वाधिक पैसा दान करण्याचाही नवा विक्रम रचला आहे. मागील चार महिन्यांमध्ये मॅकेन्झी स्कॉट यांनी तब्बल ४२० कोटी डॉलर (अंदाजे ३० हजार ६६० कोटी रुपये) ३८४ संस्थांना दान म्हणून केले आहेत. कोरोनाचा अमेरिकेतील प्रादुर्भाव वाढला असून मॅकेन्झी यांनी हा पैसा महिला, दारिद्रय रेषेखालील गरीबांसाठी काम करणाऱ्यांना संस्थांना दान केला आहे.

कोरोनाचा अमेरिकेतील नागरिकांवर कशाप्रकारे परिणाम झाला आहे, यासंदर्भातमॅकेन्झी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये भाष्य केले आहे. अमेरिकेतील महिला आणि दारिद्रय रेषेखालील गरीबांना खास करुन मोठा फटका बसला आहे. खूप संकटांना अशा लोकांना तोंड द्यावे लागत असल्याचे मॅकेन्झी सांगतात. एकीकडे या कोरोना संकटाची झळ गरीब आणि गरजू व्यक्तींना बसत असतानाचा दुसरीकडे श्रीमंतांच्या संपत्तीत झपाट्याने वाढत आहे. अशावेळी आपली जबाबदारी ओळखून श्रीमंत व्यक्तींनी समाजातील अशा घटकांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत मॅकेन्झी यांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून आतापर्यंत मॅकेन्झी यांनी सहा अरब डॉलर्सची मदत केली आहे. सध्याच्या काळामध्ये आर्थिक दृष्ट्या दूर्बल असणाऱ्यांना मदत करणाऱ्या संघटनांना सर्वांनीच पाठिंबा देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मॅकेन्झी यांनी म्हटले आहे.
जुलै महिन्यामध्ये ना नफा ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या ११६ संस्था, विद्यापीठे, सामाजिक गट आणि कायदेशीर काम करणाऱ्या संस्थांना मॅकेन्झी यांनी १.६८ अरब डॉलर एवढी रक्कम दान म्हणून दिली आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे आर्थिक फटका बसल्याने उद्धवस्त झालेल्या लोकांना मॅकेन्झी यांनी तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी आपल्या आर्थिक सल्लागारांना जास्तीत जास्त पैसा गरज असणाऱ्या संस्थांपर्यंत कसा पोहचवता येईल यासाठी काम करण्यास सांगितले आहे.सामान्यपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा दान देताना श्रीमंत लोक त्यांनीच सुरु केलेल्या संस्थाना मदत करतात. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि इतर अनेक श्रीमंत लोक अशाप्रकारे त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थांना दान देत सामाजिक भान जपतात. पण मॅकेन्झी यांनी केलेली मदत या सर्वांपेक्षा खास असल्याचे म्हणता येईल.

मॅकेन्झी यांनी तळागाळातील व्यक्तींसाठी काम करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. खाण्या-पिण्यासंदर्भातील अडचणींना तोंड देणाऱ्या, वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या, दारिद्रय रेषेखालील गरीबांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्यासाठी त्यांनी भरपूर माहिती गोळा केली आहे. यासाठी मॅकेन्झी यांनी एक टीम तयार केली असून त्यांनी त्याच्या मदतीने आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे.

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मॅकेन्झी स्कॉट या १८ व्या स्थानी आहेत. मॅकेन्झी यांची सपत्ती यावर्षी २३.६ अरब डॉलर्सवरुन वाढून ६०.७ अरब डॉलर्सपर्यंत गेली. मॅकेन्झी यांची संपत्ती अ‍ॅमेझॉन इंकच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली. मॅकेन्झी यांनी यावर्षी आतापर्यंत सहा अरब डॉलर्स दान केले आहेत. खास करुन त्यांनी कोरोना काळात मोठ्याप्रमाणात दान केले आहे.

‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, मॅकेन्झी बेझोस यांना जेफ बेझॉस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी म्हणून ३८.३ अब्ज डॉलर (सुमारे २५ लाख कोटी रुपये) देण्यात आले होते. २५ वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मॅकेन्झी यांनी दिलेले दान हे आतापर्यंतचे सर्वाधिक दान असल्याचे रॉकफेलर फिलॉन्थ्रॉपी अ‍ॅडव्हाइझर्सच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा मेलिसा बर्मन यांनी म्हटलं आहे. स्मृतीप्रत्यर्थ दान वगळता कोणत्याही व्यक्तीने दान म्हणून आतापर्यंत दिलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे बर्मन यांनी स्पष्ट केले आहे. ही रक्कम गरीबांबरोबरच बेघरांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कामांसाठी वापरली जाणार आहे.

सध्या कोरोनामुळे फटका बसलेल्या घटकांसाठी मॅकेन्झी या पैसा दान करत आहेत. पण त्यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये पाणी आणि वायू परिवर्तनासाठी काम करणाऱ्या संस्थेला दहा अरब डॉलर रुपये दान केले होते. त्यांनी मागील महिन्यामध्ये १६ वेगवेगळ्या गटांना ८० कोटी डॉलर दान देण्याची घोषणा केली होती. मॅकेन्झी यांनी बेघर लोकांसाठी दुसऱ्यांदा मोहीम हाती घेत ४२ संस्थांना १० कोटी डॉलर दान म्हणून दिले.