अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण


मुंबई- मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. यासोबत डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना ६१ वर्षीय प्रशांत दामले यांना दिल्या आहेत.

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग लॉकडाउननंतर पहिल्यांदाच १२ डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर त्यांना मुंबईत आल्यावर थोडीशी कणकण जाणवत होती. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी त्यानंतर त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.

यासंबंधीची सविस्तर माहिती फेसबुकवर प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ शेअर करून दिली. बुधवारपासून आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागणार आहेत. प्रशांत दामले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत काम करणारे सह-कलाकार निरोगी असल्याचेही सांगितले.