शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळवून देणार वेदिक पेंट

फोटो साभार टीव्ही ९

रस्ते बांधणी आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचा कारभार पाहत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देऊ शकणाऱ्या वेदिक पेंट किंवा वैदिक रंगाविषयी माहिती देताना या रंगांच्या डब्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. खादी ग्रामोद्योग मंत्रालयाने या संदर्भात जबाबदारी घेतली असून शेणापासून बनविले गेलेले हे रंग लवकरच बाजारात दाखल होत आहेत.

केंद्र सरकार ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना शेती करताना जोड धंद्यातून जादा कमाई कशी करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शेणापासून रंग तयार केले गेले आहेत. गडकरी म्हणाले हे रंग डीस्टेम्पर आणि इमल्शन अश्या दोन्ही प्रकारात आहेत. अन्य रंगांच्या तुलनेने ते स्वस्त आहेतच पण इकोफ्रेंडली आहेत. हे रंग लवकर वाळतात, अँटी बॅक्टेरीयल, अँटी फंगस आहेत आणि विषारी नाहीत. शिवाय हे रंग वॉशेबल आहेत.

गडकरी यांच्या म्हणण्यानुसार पशुपालक शेतकरी यातून वर्षात ५५ हजार रुपयांची जादा कमाई करू शकणार आहेत.