फिजी बेटे- मिनी हिंदुस्थान

फोटो साभार पिंटरेस्ट

जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय वस्ती करून आहेत. काही देशात तर त्यांची संख्या चांगलीच मोठी आहे. पण फिजी हे मिनी हिंदुस्थान म्हटले जाणारे एक नितांतसुंदर स्थळ आहे. दक्षिण पॅसिफिक मधली ही बेटे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत आणि वर्षाला येथे लाखोंच्या संखेने प्रवासी येत असतात. या बेटांवर भारतीयांची संख्या लोकसंखेच्या ३७ टक्के इतकी असून शेकडो वर्षापासून येथे भारतीय लोक राहत आहेत. जंगलसंपदा, खनिजे आणि जलस्रोत यामुळे ही बेटे प्रगतीशील आहेत. पर्यटन आणि साखर निर्यात यावर त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.

ब्रिटनने १८७४ मध्ये या बेटांवर नियंत्रण मिळवून तेथे वसाहत केली. तेथे ऊस लागवडीसाठी भारतातून मजूर नेले गेले होते. त्यांना पाच वर्षाच्या करारावर नेले गेले होते पण त्यात अट अशी होती की पाच वर्षानंतर मायदेशी जायचे असेल तर स्वखर्चाने जावे लागेल आणि १० वर्षांनी मायदेशी परतले तर ब्रिटीश सरकार खर्च करेल. अनेकांनी १० वर्षानंतर परतायचा निर्णय घेतला पण ते कधीच भारतात परतू शकले नाहीत. मग ते फिजीवासिय झाले. १९२०-३० च्या दशकात अनेक भारतीय स्वतःहून फिजी मध्ये जाऊन स्थायिक झाले.

फिजी हा ३२२ बेटांनी बनलेला देश असून त्यातील १०६ बेटांवर वस्ती आहे. मात्र प्रमुख दोन बेटे वीती लेवू आणि वानुआ लेऊ या दोन बेटांवर ८७ टक्के नागरिक राहतात. ही बेटे १५ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झाली आहेत. हिंदू वस्ती मोठी असल्याने येथे अनेक हिंदू मंदिरे आहेत. त्यातील सर्वात मोठे मंदिर नादी शहरात असून शिव सुब्रह्मण्यम हिंदू मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. येथे रामनवमी, होळी, दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते.

या बेटांवर आजही ज्वालामुखीचे उद्रेक होतात. येथे झालेल्या उत्खननात या बेटांवर इसवी सन पूर्व १००० वर्षांपूर्वी मानवी वस्ती होती असे दिसून आले मात्र त्याविषयी फार माहिती उपलब्ध नाही. त्यावेळचे आदिवासी नरभक्षक होते पण ते फक्त युद्धात ठार झालेल्या माणसाचे मांस खत असत असे सांगितले जाते.