ख्रिसमस अगोदरच या वेट्रेसला मिळाली अविस्मरणीय भेट

फोटो साभार इंडिया टुडे

कुणाचे नशीब कधी आणि कसे फळफळेल हे कोण सांगू शकणार? भले भले भविष्यवेत्ते सुद्धा कुणाच्या नशिबाची अशी खात्री देऊ शकणार नाहीत याचा अनुभव एका रेस्टोरंटमध्ये काम करणाऱ्या तरुण वेट्रेसला नुकताच आला. नाताळपूर्वीच तिला आयुष्यात विसर पडू शकणार नाही अशी गिफ्ट एका अज्ञात ग्राहकाकडून मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार इटालियन रेस्टॉरंट अँथनी अॅट पॅक्सॅन मध्ये एक ग्राहक आला आणि त्याने काही खाद्यपदार्थ ऑर्डर केले. त्याचे बिल झाले २०५ डॉलर्स. बिल देताना या ग्राहकाने त्याला खाद्यपदार्थ सर्व करणाऱ्या वेट्रेसला चक्क ५ हजार डॉलर्स म्हणजे साडेतीन लाख रुपये टीप दिली. रेस्टॉरंट मालकाने ही घटना सोशल मीडियावर शेअर करताना बिलाचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. विशेष म्हणजे भाग्यवान वेट्रेस जियाना डू एंजेलो हिला आपल्याला इतकी मोठी रक्कम टीप मध्ये मिळाल्याची कल्पनाच नव्हती. पण जेव्हा तिला हे समजले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.

जियाना अनपेक्षितपणे मिळालेल्या या गिफ्ट मुळे अतिशय भारावून गेली असून या पैशातून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा तिचा विचार आहे. शिवाय जे पैसे उरतील ते एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर या बिलाचा फोटो वेगाने व्हायरल झाला आहे.