नाताळाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना


नवी दिल्ली – बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. नाताळ साजरा करताना लोकांनी मास्क घातले नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकते, असे देखील जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नाताळानिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना लोकांनी मास्क नाही घातले तर नवीन वर्षामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळू शकते असा धोक्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना नाताळाच्या कालावधीमध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केल्याचे असोसिएट फ्री प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. किती लोकांनी नाताळाच्या कालावधीमध्ये एकत्र यावे यासाठी नियम करावेत, एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी होणार नाही हे पहावे असेही जागतिक आरोग्य संघटनेने या देशांना सांगितले आहे.

कोणाला नाताळानिमित्त पार्टी करायची असल्यास मोकळी मैदाने, घराचे अंगण आणि उघड्या जागांना प्राधान्य द्यावे. अनेकांनी बंद जागी भेटणे धोकादायक ठरु शकते, असेही जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे. हवा खेळती असणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिल्यास संसर्गाचा धोका कमी असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.

लोकांनी नाताळ साजरा करण्यासंदर्भातील निर्णय गांभीर्याने घ्यावेत असाही सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या कठीण प्रसंगी तुमचे निर्णय महत्वाचे ठरणार असून सुट्ट्या आणि कुटुंबामधील सर्वजण एकत्र येताना अधिक काळजी घ्यावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

आपल्या घरातील व्यक्ती आणि जवळचे मित्र सोबत असताना मास्क घालणे थोडे अवघडल्यासारखं वाटेल, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अडचणीचे वाटेल, पण असे केल्यास सर्वजण हे सुरक्षित आणि ठणठणीत राहण्यास मदत होईल हे लक्षात घेतले पाहिजे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या सुचनांमध्ये म्हटले आहे. हा इशारा प्रामुख्याने युरोपीयन प्रदेशामधील ५३ देश आणि रशियाबरोबरच काही आशियामधील देशांसाठी जारी करण्यात आला आहे. या देशांमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाख जणांचा मृत्यू झाला आहे.