न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी- प्रविण दरेकर


मुंबई – शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर टीका केली होती. त्यावरुन आता संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

दरेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांचे वक्तव्य बेताल आणि बेजबाबदार असून त्यांनी तर आज थेट न्यायालयाने काय केले पाहिजे, हेच सांगितले आहे. अशाप्रकारे न्यायालयावर संजय राऊतांनी भाष्य करणे हा न्यायालयाचा अवमान असून याप्रकरणी राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना असे म्हटले होते की, कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाचा प्रश्न आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. ही जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचे, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. तसेच, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत आहे.