आता व्हॉट्सअॅप वेब युझर देखील करु शकणार व्हिडीओ कॉलिंग


कोट्यावधी लोकांच्या पसंतीचे इस्टंट मेसेजिंग अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप दरवेळी आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यातच आता हळूहळू व्हॉट्सअॅपच्या मोबाइल व्हर्जनमध्ये असलेले फिचर्स व्हॉट्सअॅप वेबवरही उपलब्ध करुन दिले जात आहेत. त्यानुसार आता व्हॉट्सअॅप वेबवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.

या संदर्भात WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप बेटा युझर्सना व्हॉट्सअॅप वेबमध्ये सध्या व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. व्हॉट्सअॅपच्या सर्व वापरकर्त्यांसाठी आगामी काळात व्हॉट्सअॅप वेबवरुन व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा देण्यात येईल.

सध्या काही मोजक्या लोकांना व्हॉट्सअॅपकडून हे फिचर्स चाचणीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. व्हॉट्सअॅप वेबवरुन व्हिडिओ कॉल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे काही स्क्रिनशॉट्स देखील व्हायरल झाले आहेत. ‘व्हॉट्सअॅप वेब’मध्ये मोबाइल व्हर्जनमधील व्हॉट्सअॅप प्रमाणेच चॅटिंगच्या शिर्षस्थानी Voice आणि Video कॉलचा पर्याय देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉल येताच तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपच्या स्क्रिनवर एक पॉपअप विंडो सुरू होते. यात कॉल उचलण्याचा आणि कट करण्याचा पर्याय असेल.

मोबाइल प्रमाणेच व्हॉट्सअॅप वेबवरील व्हिडिओ कॉलमध्येही ऑडिओ म्यूट आणि ऑफ करण्याचा पर्याय देण्यात येईल. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅप वेबमध्ये एखाद्याचा व्हिडिओ कॉल आल्यास तुम्हाला व्हिडिओ कॉल एका विंडोमध्ये सुरू ठेवून दुसऱ्या विंडोमध्ये चॅटिंग देखील करता येणार आहे. दरम्यान, ही नवी सुविधा सामन्यांसाठी केव्हा सुरू होईल याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. जर तुम्ही व्हॉट्सअॅपचे बेटा टेस्टर असाल तर तुम्हाला देखील व्हॉट्सअॅप वेबवर व्हि़डिओ आणि ऑडिओ कॉलिंगचा पर्याय मिळेल. तोपर्यंत या सुविधेची अधिकृत घोषणा होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.