तृणमूल काँग्रेसमधील आणखी पाच स्थानिक नेत्यांनी सोडली ममतांची साथ


कोलकाता – जरी पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असली तरी पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ होण्यास सुरूवात झाली आहे. कालच तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासातच तृणमूल काँग्रेसला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाची साथ सोडत राजीनामे दिले आहेत.

बुधवारी अचानक मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये ते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अधिकारी १९ डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असून, तृणमूलला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच तृणमूलच्या आणखी पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. तृणमूल काँग्रेसचे गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे त्यांनी राजीनामे सुपूर्द केले आहेत.

पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामे करता येत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे कारण या नेत्यांनी सांगितले. राजीनामे महत्त्वाचे नसून, प्रत्येक विभागात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बामोणगोला विभागातही पाच समित्या स्थापन करण्यात आल्याचे तृणमूल काँग्रेसचे मालदाचे जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांनी सांगितले.

यापूर्वी ममतांच्या मंत्रिमंडळातून पक्षावर नाराज असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचाही राजीनामा दिला. अधिकारी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे भाजपवर नेत्यांना फोडत असल्याचा आरोप करत तृणमूलने निशाणा साधला आहे.