सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अर्णब गोस्वामींनी घेतला मागे


मुंबई – मुंबईच्या सत्र न्यायालयात दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींनी मागे घेतली आहे. एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गेल्या महिन्यात सरकारी कर्मचार्‍याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल अर्णब, त्यांची पत्नी सम्याब्रता रे, त्यांचा मुलगा आणि दोन इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यांच्या पत्नीवर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. गोस्वामी यांनी याच प्रकरणात अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. पण पत्नीची याचिका अद्याप मागे घेण्यात आली आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही.

इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला कथिररित्या आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात चार नोव्हेंबरला पोलिसांची टीम अर्णब गोस्वामीलला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. दरम्यान पोलिसांनी आरोप केला होता की, त्यांनी एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत कथितरित्या मारहाण केली होती. याच प्रकरणात मध्य मुंबईच्या एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गेल्या आठवड्यात अर्णब गोस्वामीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

भारतीय दंड संहितेच्या कलम 353 (लोकसेवकाच्या कामात अडथळा आणणे), 504 (शांततेचा भंग केल्याबद्दल कुणी जाणूनबुजून अपमान करणे) आणि 506 (फौजदारी धमकी / धमकी देणे) आणि सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवण्यासंदर्भात गुन्हा अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 49 वर्षीय पोलिस अधिकारी सुजाता तनवाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.